
अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार..
अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणार.. शुक्रवारी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक !
प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी व या समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींसमवेत दि.२१ एप्रिल २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेब सर्व समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी कार्यरत असून अल्पसंख्याक समुदायांना शिक्षण, आरोग्य व कौशल्य विकास क्षेत्रात मजबूत करणे आणि त्यांना चांगल्या सामाजिक-आर्थिक, पायाभूत सुविधा प्रदान करण्याच्या अनुषंगाने प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू नसल्याने आपण दि. ८ एप्रिल २०२३ रोजी अल्पसंख्यांक समाजाच्या प्रमुख व्यक्तींसमवेत सर्किट हाऊस, धाराशिव येथे बैठक घेतली होती. या बैठकीस मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध व जैन अशा जिल्ह्यातील प्रमुख अल्पसंख्यांक समाजातील उच्चशिक्षित व नामांकित व्यक्ती उपस्थित होत्या.
सदरील बैठकीमध्ये जिल्ह्यात प्राधान्याने शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास व महिला सक्षमीकरण प्रकल्पावर भर देण्याचे ठरले. अस्तित्वातील शाळा व महाविद्यालयात सुधारणा करणे, हॉस्पिटल मध्ये एम.आर.आय., कॅथ लॅब, सिटी स्कॅन, नवजात शिशु व बाल अतिदक्षता विभाग, एन्डोस्कोपी यासारख्या अद्ययावत सुविधा निर्माण करणे, कौशल्य विकासावर भर देऊन प्रामुख्याने महिला व मुलींना प्रशिक्षित करून जिल्ह्यात रोजगार – स्वयंरोजगार निर्माण करणे या बाबींवर सविस्तर चर्चा झाली. क्रीडा क्षेत्रातील जिल्ह्याची उज्ज्वल परंपरा लक्षात घेता या क्षेत्रात देखील काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या योजनेंतर्गत जिल्ह्यात कुठे व कोणते प्रकल्प राबविता येतील याबाबत चर्चा करून पहिल्या टप्प्यात जिल्ह्याचे ठिकाण म्हणून धाराशिव शहरात मोठी ५ कामे हाती घेऊन त्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरले आहे. या अनुषंगाने दि २१ एप्रिल २०२३ रोजी दु.३ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. सदरील बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), पोलीस अधिक्षक, मुख्याध्याधिकारी न.प.धाराशिव, कार्यकारी अभियंता सा.बां.विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी (जि.प.), शिक्षणाधिकारी (प्राथ.व माध्य.), उपस्थित राहणार आहेत.
योजनेच्या अनुषंगाने अल्पसंख्याक समाजातील ज्या व्यक्तींना काही मुद्दे मांडायचे आहेत, त्यांनी या बैठकीमध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती.
#अल्पसंख्यांक #योजना #धाराशिव #जिल्हाधिकारी #नियोजन #रोजगार #कौशल्य_विकास #Dharashiv #Minority #Scheme #Planning