
रेडिओ तेरणा ९०.४ एफएम च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!
रेडिओ तेरणा ९०.४ एफएम च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! युनिसेफ आणि एसबीसी ३ (सोशल अॅण्ड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन) च्या प्रकल्पांतर्गत राज्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल टीमचे अभिनंदन केले.
रेडिओ तेरणाच्या एकूणच प्रवासामध्ये ६,००० तासांचे ऑनलाईन प्रसारण तसेच लाखोंच्या घरात ऑफलाईन प्रसरण ऐकले जात होते. परंतु केवळ वर्षभराच्या कालावधीमध्ये ते प्रसारण ८०,००० तासांच्या वर गेले असून २,००० जीबी पेक्षा जास्त डेटा यासाठी वापरला जात आहे.
युनिसेफ आणि एसबीसी ३ च्या अंतर्गत ‘आमची उर्मिला’ या शीर्षकांतर्गत एकूण ५ विषयांची नाटिका प्रसारित करण्यात आली. यामध्ये बालविवाह, लैंगिक समानता, लिंग आधारित हिंसा, पितृसत्ता आणि लैंगिक अत्याचार हे महत्त्वपूर्ण विषय होते.
या सर्व विषयांचे महत्व वाढले कारण बालविवाहाचे प्रमाण महाराष्ट्रात २१% तर धाराशिव जिल्ह्यात हेच प्रमाण ३६% इतके आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण २६ रेडिओ स्टेशन्सने भाग घेतला होता.
विषय संवेदनशील असल्यामुळे त्याचे लिखाण आणि सादरीकरण महत्त्वपूर्ण होते. परंतु या सर्व बाबींवर यशस्वी मात करून रेडिओ तेरणाने हा पुरस्कार पटकावला. या नाटकांचे सर्व लिखाण प्रोग्राम मॅनेजर श्री.रमेश पेठे यांनी तर दिग्दर्शन स्टेशन डायरेक्टर श्री.संजय मैंदर्गे यांनी केले होते.
या सर्व नाटकांच्या सादरीकरणांमध्ये प्रामुख्याने प्रगतीताई शेरखाने, श्री.वरूण जोशी, संध्याताई पवार, वैष्णवीताई मोहिरे, श्री.शुभम शेरखाने आणि अमृताताई देशपांडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
तसेच या प्रकल्प अंतर्गत व्यंकटेश महाजन महाविद्यालयाच्या परिसरामध्ये करियर आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबिरेही घेण्यात आली होती. यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राहुल गुप्ता, व्यवसाय मार्गदर्शक श्री.महादेव खामकर आणि मोटिवेशनल स्पीकर श्री.अर्शद सय्यद यांनी मार्गदर्शन केले.
यामध्ये ३०० पेक्षा अधिक मुलींनी सहभाग नोंदवला. तसेच रुईभर, ता.धाराशिव येथील जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे बालविवाह या विषयाच्या अनुषंगाने निबंध, वक्तृत्व आणि काव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या वक्तृत्व, निबंध आणि काव्यवाचन स्पर्धेमध्ये जवळपास २०० पेक्षा अधिक मुलींनी सहभाग नोंदवला.
या सर्व स्पर्धा पाहण्यासाठी शाळेतील जवळपास १,००० विद्यार्थी उपस्थित होते. सर्व स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र आणि विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमासाठी रुईभर शाळेचे व संस्थेचे अध्यक्ष श्री.सुभाष दादा कोळगे, ग्रामसेवक श्री.कुंभार तसेच सर्व शिक्षकांनी सहभाग नोंदवला.
#रेडिओ #धाराशिव #Radio #dharashiv