
‘मालगाडी ते वंदे भारत’ पुरुषप्रधान प्रोफेशनचा “ट्रॅक” कायमचा बदलणारी जिजाऊची लेक – सौ.सुरेखा भोसले!
‘मालगाडी ते वंदे भारत’ पुरुषप्रधान प्रोफेशनचा “ट्रॅक” कायमचा बदलणारी जिजाऊची लेक – सौ.सुरेखा भोसले!
संधीचे नवे द्वार उघडण्यासाठी पहिले पाऊल कोण उचलते याला खूप महत्त्व असते. विशेषत: पिढ्यानपिढ्या जिथे केवळ पुरुष काम करतात तेथे.. अशा ठिकाणी सोयी सुविधा, नियम केवळ पुरुष केंद्रित बनलेले असतात. शिफ्टच्या वेळा, प्रवासादरम्यान राहण्याची ठिकाणे, ट्रेनिंग सुविधा इत्यादी पुरुषांच्या पद्धतीने तयार असतात, त्या गर्दीत जेंव्हा एखादी महिला प्रवेश करते तेंव्हा संपूर्ण व्यवस्थापनाला पुन्हा नव्याने विचार करण्यास भाग पाडते. नव्या व्यवस्था निर्माण होतात, नवे ट्रॅक तयार केले जातात, नवी रीत लागते. एकप्रकारे पुढील महिलांसाठी ती महिला सुलभ वाट तयार करून देत असते.
पण इतरांसाठी संधी सुलभ होत असताना, पहिल्या महिलेचा मार्ग मात्र पदोपदी खडतर असतो.
साताऱ्याचा सौ.सुरेखा भोसले यांच्या करियरचा प्रवास देखील प्रेरणादायी आहे. इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा कोर्स त्यांनी पूर्ण केला. रेल्वेमध्ये त्या जेव्हा परीक्षेसाठी दाखल झाल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आले की सदरील जागेसाठी एकाही महिलेने अर्ज केलेला नाही. मात्र त्यांनी निडरपणे परीक्षा दिली. त्यांचे यश बघून त्यांना ट्रेनी असिस्टंट ड्रायव्हर या पदाची ट्रेनिंग देण्यासाठी पाठवले गेले.
नंतर १९८९ साली त्यांची असिस्टंट ड्रायव्हर पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांनी करियरची सुरुवात एल ५० या लोकल मालगाडीच्या चालक म्हणून केली. इंजिन आणि सिग्नल संबंधित काम त्यांनी मोठ्या यशस्वीपणे पार पाडले. १९९८ साली त्या एक परिपूर्ण मालगाडी चालक बनल्या व त्यांनी २९ वर्ष रेल्वेत नोकरी केली.
२०११ मध्ये त्यांना आशिया खंडातील पहिल्या महिला ट्रेन ड्रायव्हर म्हणून सन्मानित करण्यात आले कारण त्यांनी मुंबई-पुणे दरम्यानच्या घाट रस्त्यावर यशस्वीपणे डेक्कन क्वीन रेल्वे चालवली होती. २०११ पासून त्या कल्याणच्या सेंटरमध्ये नवीन तरुणांना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत.
आशिया खंडातील पहिल्या महिला ट्रेन चालक बनण्याचा त्यांचा प्रवास असंख्य विद्यार्थिनींना, महिलांना प्रेरणादायी ठरत आहे.
अंतराळात जाणारी स्व.कल्पना चावला जितकी महत्त्वाची तितकीच महिलांसाठी रोजगाराच्या लाखो संधी उपलब्ध करून देणारी सौ.सुरेखा भोसले देखील महत्त्वाची..
आशिया खंडातील पहिली महिला लोको पायलट हा मान मोठा असला, तरीही ट्रॅक बदलताना होणारा खडखडाट केवळ या भगिनीलाच माहिती आहे..
#vandebharat #Train #VandeBharatExpress #maharashtra #वंदे_भारत_एक्सप्रेस #womenempowerment